लिव्ह इन रिलेशनशिपवर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, लग्न हे फक्त शारीरिक…

नवी दिल्ली : भारतीय समाजातील बदलत्या नातेसंबंधांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपच्या संकल्पनेवर टीका करत कुटुंब आणि विवाह व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.
सध्या समाजात वाढत चाललेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या प्रवृत्तीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. लिव्ह इन रिलेशनशिपची कॉन्सेप्ट सर्वांसमोर आहे. यात तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. हे योग्य नाही, असं मोहन भागवत म्हणाले.
कुटुंब, लग्न हे फक्त शारिरक समाधानाचं माध्यम नाहीय, हा एक समाजाचा एक भाग आहे. कुटुंब अशी एक जागा आहे, जिथे कुठलाही व्यक्ती समाजात राहणं शिकतो. लोकांना मूल्य तिथूनच मिळतात” असं मोहन भागवत म्हणाले.

कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व विशद करताना मोहन भागवत यांनी सांगितले की, कुटुंब ही अशी जागा आहे जिथे व्यक्ती समाजात कसं राहायचं, हे शिकतो. माणसाला आवश्यक असलेली मूल्य, संस्कार आणि जबाबदारीची भावना कुटुंबातूनच मिळते. समाज घडवण्यासाठी कुटुंब ही मूलभूत रचना असल्याचं त्यांनी अधोरेखित केले आहे.

ते पुढे म्हणाले की, कुटुंब हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक व्यवस्थेचाही केंद्रबिंदू आहे. बचत, संपत्ती, सोनं, आर्थिक नियोजन या सर्व गोष्टी कुटुंबाभोवती फिरतात. सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांचा संगम कुटुंबातच होत असल्याने विवाह आणि कुटुंब व्यवस्थेपासून दूर जाणं समाजासाठी घातक ठरू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. लग्न करायचं नसेल, तर संन्यासी होणं स्वीकार्य आहे, पण जबाबदारी टाळणं योग्य नाही, असं विधान त्यांनी केले आहे.
कुटुंब नियोजनावर बोलताना मोहन भागवत यांनी कोणताही ठराविक फॉर्म्युला नसल्याचं सांगितलं. मात्र संशोधनाच्या आधारे तीन मुलांचं कुटुंब आदर्श ठरू शकतं, असं त्यांनी मत व्यक्त केलं. १९ ते २५ वयोगटात लग्न झाल्यास आई-वडील आणि मुलांचं आरोग्य अधिक चांगलं राहतं, असं निरीक्षण त्यांनी मांडलं.
तीन मुलं असल्यास पालक आणि मुलांमध्ये जबाबदारीची भावना वाढते आणि ईगो मॅनेजमेंट शिकायला मिळतं, असं मानसोपचारतज्ज्ञांचं मत असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसंख्या हा विषय संवेदनशील असून ती एक ओझं असली तरी योग्य नियोजन केल्यास ती देशासाठी संपत्ती ठरू शकते, असंही भागवत म्हणाले आहे.
