मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढणार, संजय राऊतांचा मोठा खुलासा..

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आता जवळ आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दोन भावांचे मनोमिलन झाले असून, आता युतीची अधिकृत घोषणा केवळ औपचारिकता उरली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधीच शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा वाजत-गाजत केली जाईल.

आज दिवसभरात सर्व चर्चांवर शेवटचा हात फिरवला जाईल. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती सजंय राऊत यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांवर टीका करताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, काही नाटकांची तिकिटे मालक स्वतःच विकत घेतात आणि ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लावतात; कालचा निकालही तसाच होता.
हा शो हाऊसफुल्ल नव्हता, तर कोट्यावधी रुपये खर्च करून तो तसा दाखवण्यात आला. मात्र, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हे नाटक नाही, तर तो ‘प्रितीसंगम’ आहे. महाराष्ट्राची जनता या प्रितीसंगमामध्ये नक्कीच सहभागी होईल.
तसेच या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने भाजप, शिंदे गट, अजित पवार गट प्रचंड पैशाचा वापर केल्याचा आरोप राऊतांनी केला. या निवडणुकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. हा पैसा कुठून आला? हा जनतेचाच पैसा आहे. आम्ही या पैशाच्या जोरावर नाही, तर जनतेच्या विश्वासावर आणि ‘ठाकरे’ नावाच्या ताकदीवर निवडणूक लढणार आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
