मतदारांची जोरदार कामगिरी, भाजपची घराणेशाही बसवली घरी, नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा पराभव; मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सभा…

नांदेड : जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. घराणेशाहीवरुन काँग्रेसला वारंवार लक्ष्य करणाऱ्या भाजपची घराणेशाही मतदारांनी घरी बसवली आहे.
भाजपनं एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकीट दिल्यानं लोहा नगरपरिषद निवडणूक चर्चेचा विषय ठरली. या सहाच्या सहा जणांचा पराभव मतदारांनी घडवला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे लोहा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून दिग्गजांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या सभांचा धडाका भाजपनं लावला. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी कॉर्नर बैठका घेतल्या. पण तरीही भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. लोहा नगरपरिषदेतील भाजपचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा या निवडणुकीनंतर सुरु झाली आहे.

लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती. मात्र, जनतेनं या सर्वांना नाकारले असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दाखवून दिलं. भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती. इथे नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

नांदेड जिल्ह्याचं लक्ष लोहा नगर परिषदेकडे लागलं असून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाल्लेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. लोहा नगर परिषद एकूण दहा प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होतं आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. ज्यात नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून, मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली होती.
