यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार की नाही? सरकारची भूमिका काय?

पुणे :भारतात 2017 सालापासून अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा फेब्रुवारी 2026 रोजीच्या बजेट विषयी मोठा संभ्रम तयार झाला आहे. पुढील वर्षी एक फेब्रुवारी रोजी रविवार येत आहे.सामान्यतः रविवारी सरकारी कार्यालये आणि शेअर बाजार बंद असतात. अशा परिस्थितीत, अर्थमंत्री त्याच दिवशी अर्थसंकल्प सादर करतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या फेब्रुवारी 2026 च्या अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत सध्या तीन पर्यायांवर चर्चा सुरू आहे.
31 जानेवारी (शनिवार) म्हणजेच एक दिवस आधी अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. यापूर्वीही शनिवारी बजेट सादर झाले आहेत.1 फेब्रुवारी (रविवार) सुट्टी असूनही परंपरेनुसार त्याच दिवशी बजेट मांडला जाऊ शकतो.2 फेब्रुवारी (सोमवार) रोजी सुट्टीनंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी बजेट सादर केले जाऊ शकतो.

विशेष म्हणजे, 1 फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती देखील आहे. ज्यामुळे सुट्टीचे महत्त्व अधिक वाढते. यावर अंतिम निर्णय ‘संसदीय व्यवहारांच्या कॅबिनेट समिती’ कडून घेतला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर करण्यास अजून जवळपास एक महिना असल्याने सरकार लवकरच याविषयी भूमिका सादर करील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. जर रविवारी अर्थसंकल्प सादर केला, तर त्या दिवशी शेअर बाजार विशेष सत्रासाठी उघड ठेवावा लागेल. त्यामुळे गुंतवणूकदार आणि आर्थिक विश्लेषकांचे डोळे आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहेत.
