उरुळीकांचन ग्रामपंचायतीचा खुर्चीचा खेळ शेवट पर्यंत रंगला; शेवटच्या सरपंचपदी अखेर मिलिंद जगताप यांची बाजी….

उरुळी कांचन : मागील पाच वर्षात खुर्चीचा रंगीत खेळ पाहिला लावणाऱ्या उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील या पंचवार्षिक कालावधीच्या शेवटच्या सरपंचपदी मिलिंद तुळशीराम जगताप यांची ९ विरुद्ध ६ मतांनी निवड झाली आहे. अर्थिक प्रलोभने व सत्तेचा विक्राळतेचा उच्चांक गाठलेल्या या ग्रामपंचायतीची शेवटची निवडही अनपेक्षितपणे चुरशीची ठरली आहे.

कसल्याही राजकीय गटांची ओळख नसलेल्या उरुळीकांचन या हवेली तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतीच्या अखेरच्या सरपंचपदाची निवडणूक चुरशीची ठरुन शेवटच्या क्षणी ग्रामपंचायतीत अनेक वर्षे काम केलेल्या मिलिंद जगताप यांना सरपंचपदाची संधी देण्याच्या हेतूने संधी मिळाली आहे. सरपंचपदाच्या शेवटच्या कसोटीत सर्व सहकाऱ्यांत संघर्ष उफाळून अखेरीस ही माळ मिलिंद जगताप यांच्या गळ्यात पडली आहे.

शुक्रवारी (दि.१९) रोजी झालेल्या सरपंचपदाच्या अनपेक्षित निवडणूकीत सरपंचपदासाठी मिलिंद जगताप व प्रियंका पाटेकर – कांचन यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानात मिलिंद जगताप यांना ९ तर प्रियंका पाटेकर -कांचन यांना ६ मते मिळाली. १ मते बाद झाले तर १सदस्य बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. मंडल अधिकारी तथा उरुळीकांचन मंडळ अधिकारी माधुरी बागले यांनी मिलिंद जगताप यांची निवड जाहीर केली आहे.

दरम्यान उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत प्रभागनिहाय निवडून होऊन १७ सदस्यांचे मंडळ स्थापन झाले होते. विविध विवादीत मुद्दे व प्रसंग घडून जिल्ह्यात ग्रामपंचायत अनेक अर्थाने गाजली आहे. या ग्रामपंचायतीवर काही वेळा सहमती व काही वेळा विरोधाभास तयार होऊन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यापूर्वी ६ जणांना सरपंचपदाची संधी प्राप्त झाली आहे. तर मिलिंद जगताप यांच्या रुपाने ७ वा सरपंच या ग्रामपंचायतीचा उर्वरीत कारभार भूषविणार आहे.
