एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस हळूहळू संपवतील! उपमुख्यमंत्र्यांना कोणी दिला सूचक इशारा? नेमकं घडतंय काय?

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सातारा ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
अशातच आता शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना सूचक इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने तुमचा ‘गेम’ करतील असं ते म्हणाले आहे. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का, अशी शंका व्यक्त करीत ते शेवटचा घाव ‘मिंध्यां’ वरच घालतील, असा दावाही त्यांनी केला.
धनंजय मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. ‘वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात आहे. अजूनही खटला संपलेला नाही. अशावेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप होते, त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचे पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणे फडणवीसांना कठीण जाऊ शकते’ असे ते म्हणाले आहे.

फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे गेले. हा या सरकारला लागलेला काळिमा आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत.

त्यांना त्वरित बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतरही अनेक विषय आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने ‘गेम’ करतील आणि शेवटचा घाव ते ‘मिंध्यां’ वरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
