नवीन वर्षात मोबाईल रिचार्ज ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोबाईल वापरकर्त्यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या मोबाईल रिचार्ज प्लानच्या दरात लक्षणीय वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या 2026 मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लान महाग करू शकतात. मोबाईल रिचार्ज दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी जुलै 2024 मध्ये शेवटची दरवाढ झाली होती.
टेलिकॉम कंपन्यांच्या आतापर्यंतच्या धोरणावर नजर टाकल्यास, साधारण दर दोन वर्षांनी दरवाढ केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे 2026 मध्ये पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशावर भार पडणार असल्याचे संकेत आहेत.

फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या 2026 मध्ये 4G आणि 5G प्लानच्या किमती 16 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. 5G नेटवर्कसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली गुंतवणूक आणि कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न हे दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जात आहे.

सध्या टेलिकॉम कंपन्या जास्त किमतीचे प्लान, ओटीटी फायदे आणि मर्यादित डेटा असलेले 5G बंडल देऊन अप्रत्यक्षपणे दरवाढ करत आहेत. आता बहुतांश 5G प्लानमध्ये केवळ 2GB प्रतिदिन डेटा दिला जात असून, भविष्यात ही सेवा आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 दरम्यान टॅरिफ वाढ लागू होऊ शकते. 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत बहुतेक टेलिकॉम कंपन्या दरवाढ जाहीर करू शकतात. ही वाढ प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी लागू असेल.
