महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपात आज होणार प्रवेश…

मुंबई : काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा बुधवारपासूनच राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याच्या दृष्टीने आज सकाळी घडामोड झाली.
काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी अखेर आज आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेच्या विधीमंडळ सचिवांकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे.प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ आहे.
भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. डॉ. प्रज्ञा सातव यांन आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. सातव यांच्या निर्णयामुळे हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आज (१८ डिसेंबर) त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.
