ब्रेकिंग! कुठल्या क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटें लीलावती रुग्णालयात दाखल

पुणे:मंत्री माणिकराव कोकाटे यांना १९९५ च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच दरम्यान, माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्री माणिकराव कोकाटे हे रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावर उपचाराधीन आहेत. कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. लीलावती रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. न्यायालयाकडून अटकेच्या आदेशाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करतील. सध्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने २ वर्षाचा कारावास शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हायकोर्टात शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरले आहे. फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली होती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला असून कोकाटे यांची अटक आणि आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान सरकारी पक्षाने केलेल्या पाठपुराव्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. अशातच आता ते रुग्णालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
