ब्रेकिंग! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा धक्का, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता..


नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी कोकाटे यांना सुनावलेली २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.

दोन वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आज अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे.

तसेच मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणातील त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर माणिकराव कोकाटे आज मुंबईत अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगितले जात होते.

तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. परंतु, न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदावरही गंडांतर आले आहे.

       

या पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटून आपली बाजू मांडणार होते. मात्र, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांना पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माणिकराव कोकाटे यांचे अटक वॉरंट निघाल्यास अजित पवार त्यामध्ये हस्तक्षेप करुन मार्ग काढणार का, हे आता पाहावे लागेल. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून याविरोधात तातडीने उच्च न्यायालयात जाऊन अटक वॉरंटला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात.

यापूर्वी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे संकटात सापडले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकांनी प्रचंड दबाव निर्माण केला होता.

परंतु, अजित पवार यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्री केले होते. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्यास ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नामुष्कीची बाब ठरु शकते.

त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होऊ नये, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात असल्याचे समजते. त्यामुळे आता अजित पवार हे गेल्यावेळप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा पाठीशी घालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!