महायुतीत ठिणगी ; मुंबई महापालिकेसाठी शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह, भाजप काय निर्णय घेणार?

मुंबई:मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. यावर आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जागावाटपावर चर्चा चालू आहे. शिंदे गट एकूण 125 जागांवर ठाम असून यापेक्षा कमी जागा मिळाल्यास ती आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते, असे मत शिंदे यांच्या शिवसेनेकडून व्यक्त केले जात आहे. 2017 साली शिवसेनेचे एकूण 84+4 असे एकूण 88 नगरसेवक होते. हे सर्व नगरसेवक धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे या सर्व जागांवर शिवसेनेचाच अधिकार आहे, असे शिवसेनेचे मत आहे. तसा दावा शिवसेनेने केला आहे.
भाजपने 2017 साली एकूण 82 जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा भाजपाच्या असतील. असेही मत शिंदे गटाने व्यक्त केले आहे. उर्वरित जागांवर वाटाघाटी करून निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव शिंदे यांच्या पक्षाने ठेवला आहे. 100 पेक्षा कमी जागा घेणे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असून 125 जागेवर शिवसेना पक्ष ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट पूर्ण ताकद लावणार आहे. तर त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपा नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या दोन्ही पक्षांत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

