धक्कादायक! फुरसुंगीत मतदारांना दारू वाटप करताना उमेदवाराच्या मुलाला रंगेहात पकडले, दोन जणांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे. मतदार राजाच्या मताचे दान आपल्याच पदरात पडावे म्हणून इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते विविध प्रकारचे फंडे आजमावत आहेत. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना वाटप करण्यासाठी चालवलेली दारू निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पडकली आहे.
ही कारवाई सोमवार (१५ डिसेंबर) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील फुरसुंगी उरुळी देवाची – फुरसुंगी मतदार संघातील फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलजवळ घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यास आला असून चारचाकी गाडीसह सुमारे ७ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुहास रामचंद्र गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वेदांत राहुल कामठे (वय १९ रा. पांडवदंड, फुरसुंगी, पुणे) व आकाश तुकाराम मुंडे (वय २४ रा. शिवम हॉस्पिटल शेजारी, तरवडी फुरसुंगी, पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुहास गवळी हे निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकात कार्यरत आहेत. हे पथक निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चावर आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एकाच ठिकाणी (उदा. चेकपोस्ट किंवा महत्त्वाच्या चौकात) बसून काम करते. हे पथक व्हिडीओ आणि फोटोद्वारे पुरावे गोळा करतात आणि भरारी पथकासोबत मिळून आचारसंहितेची अंमलबजावणी सुनिश्चित करतात.

गवळी हे सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस कर्तव्य बजावीत होते. त्यावेळी पुणे-सोलापुर महामार्गावरून फुरसुंगी या ठिकाणी जात असलेली एक टाटा नेक्सॉन ई व्ही क्रमांक (एमएच १२ वायएल ७१७३) हि गाडी एस. एस. टी पॉईंट जवळील रोडने चालली होती. संंशय आला म्हणून या गाडीची तपासणी केली असता डिकीमध्ये रॉयल स्टॅगसह विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या.
या गाडीत असलेले वेदांत कामठे व आकाश मुंडे यांच्याकडे दारूच्या संदर्भात अधिक विचारणा केली असता, त्यांचेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून अवैधरित्या दारू बाळगून त्यांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती फुरसुंगी पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, फुरसुंगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दारूसह कार असा सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दोन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करपे करत आहेत.
