वाघोली येथे अवैध गुटखा साठ्यावर धाड; ११ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी…

पुणे : गुन्हे शाखा युनिट ६ चे पथकाने हवेली तालुक्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठवून ठेवण्यात आलेल्या अवैध गुटखा विक्री व साठ्यावर धडक कारवाई करुन ११ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका परप्रांतीयासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, अन्न सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शाहिद जहीर मलीक (वय २८, सध्या रा. खराडी, पुणे, मुळगाव उत्तरप्रदेश) व अरफात इसतीयाक अंसारी (वय २०, सध्या रा. वाघोली, पुणे, मुळगाव पालघर, ठाणे) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल ११ लाख ३४ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू तसेच वाहने व मोबाईल फोनचा समावेश आहे.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार लांडे व तनपुरे यांना खबऱ्याकडून अवैध गुटखा साठवणूक व विक्रीबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाघोली परिसरात शाहिद मलीक व अरफात अंसारी यांना त्यांच्या ताब्यातील महिंद्र पिकअप व ॲक्टीव्हा वाहनांसह ताब्यात घेतले.

तसेच खराडी येथील त्यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला असता तेथे विमल, गोवा, तानसेन, काका, आर.एम.डी. यांसारख्या विविध नामांकित ब्रँडचे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखू असा एकूण ५ लाख १४ हजार ८१६ रुपयांचा साठा आढळून आला. याशिवाय महिंद्र पिकअप वाहन, ॲक्टीव्हा दुचाकी आणि वापरते मोबाईल फोन असा मिळून एकूण ११ लाख ३४ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गुटखा विक्रीच्या साखळीचा सखोल तपास सुरू आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, गिरीश नाणेकर, सारंग दळे, सुहास तांबेकर, संभाजी सकटे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तानपुरे, नेहा तापकीर, प्रतीक्षा पानसरे, यांच्या पथकाने केली आहे.
