मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा दणका, आमदारकी रद्द होणार अन् मंत्रिपदही जाणार?

पुणे:गेल्या काही दिवसापासून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे चांगले चर्चेत आले आहेत.आता ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात ते अडचणीत आलेले आहेत. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानेही माणिकराव कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला होता. कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले.

दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा सुनावली आणि त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने देखील शिक्षा कायम ठेवली आहे.त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल आहे.

आता माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला असून शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
