संतोष देशमुख हत्या प्रकरण ; मास्टरमाईंड वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल?

पुणे:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला 9 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले.या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या अर्जावर आज उर्वरीत युक्तीवाद होणार आहे. या सुनावणीत कराडला जेल की बेल होणार याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराड यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. शुक्रवारी ही सुनावणी अर्धवट राहिली होती आज ही सुनावणी पूर्ण होईल असे वाटते, या सुनावणीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबिय हजर आहेत. धनंजय देशमुख यांनी सुनावणीपूर्वी मोठा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत धनंजय देशमुख यांनी असे म्हटले आहे की,आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्ही न्यायव्यतिरिक्त काही बोललेलो नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आरोपी नंबर एकने हायकोर्टात 12 तारखेला बेल एप्लीकेशन दाखल केले होते. त्यासंदर्भात आर्ग्युमेंटचा काही भाग आज कोर्टात होणार आहे.

दरम्यान या आरोपीचे राज आश्रय घेतलेले समर्थक हे न्यायालय, एसआयटी, मुख्यमंत्री, सीआयडी यांना चॅलेंज करत आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल आहे.

