महाराष्ट्र हादरला! मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात रक्ताचा सडा, २१ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला, नेमकं घडलं काय?


नाशिक : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या वादातून टोळक्याने एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये एका आनंदाच्या कार्यक्रमाला अचानक हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून२१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीत घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, स्पर्श नितीन कामे (वय २१, रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) हा युवक शुक्रवारी रात्री मित्र मयूर कुमावत यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी महादेव कॉलनीत गेला होता. कार्यक्रमात नाचत असताना स्पर्श कामे याचा चंद्रभान गणपत चोथवे (वय २३, रा. तरसेचाळ, क्रांतिनगर) याला चुकून धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढताच चंद्रभान चोथवे याच्यासह सुमित बोडके आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांनी स्पर्श कामे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आनंदाचा माहोल क्षणातच तणावपूर्ण बनला. उपस्थितांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली.

       

दरम्यान, वादाच्या भरात सुमित बोडके याने थांब, तुझा मर्डर करून टाकतो, अशी धमकी देत स्पर्श कामे याच्यावर धारदार चाकूने वार केला. पोटाजवळ चाकू खुपसण्यात आल्याने स्पर्श गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फिर्यादी अमोल धनराज कुमावत आणि नातेवाइकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी टोळक्याने त्यांनाही शिवीगाळ करत “तुम्हालाही बघून घेऊ” अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं.

दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चंद्रभान चोथवे याला अटक करण्यात आली आहे. सुमित बोडके आणि त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!