‘माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल’ ; कोल्हापुरातील डॉक्टरची आत्महत्या, शेवटचा भावनिक मेसेज समोर

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजाराम तलावात एका तरुणाने चक्क पाठीवर दगड विटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कौटुंबिक तणावातून या तरुण दंतचिकित्सकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने ‘माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल’असा भावनिक संदेश आपल्या मित्रांसह नातेवाईकांना पाठवले होते, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे (वय 35, रा. जयसिंगपूर – 11 वी गल्ली) यांनी कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याच्या स्थितीतून शुक्रवारी उशिरा रात्री राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ते मूळचे जयसिंगपूर शहरातील आहेत. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी आढळल्याने या घटनेचा उलगडा झाला.
त्यांचा शोध घेतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश जप्त करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

शुक्रवारी रात्री अवधूत यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना आणि परिचितांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते. “मी पाठीवरील बॅगेत दगड विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल” अशा आशयाचे भावनिक मेसेज त्यांनी पाठवले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून पोलिसांना देण्यात आली आहे.

पोलीस तपासात या संदेशांमधून मानसिक नैराश्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत. पोलिसांनी संबंधित मोबाईल संदेश तपासासाठी हस्तगत केले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
