राजकीय भूकंप ; पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजकारणासंदर्भात महत्त्वपूर्ण धक्कादायक दावा केला आहे. येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असून भारताच्या पंतप्रधानपदावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळं मराठी माणूस भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी काहीतरी मोठी घडामोड घडेल आणि त्यामुळे मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकेल, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
पुढे बोलताना चव्हाण यांनी अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ देत सांगितले की, 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एफस्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित एका प्रकरणात मोठी माहिती जाहीर होणार आहे. या माहितीमुळे काही मोठ्या नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता असून याचा अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो, असं त्यांनी सूचित केलं आहे.

दरम्यान 19 डिसेंबर रोजी नेमके काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. सध्या अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही लोकांनी काही विशिष्ट कृती केल्या आहेत आणि काही लोकांची नावे पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत. त्यामुळे काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे. जर असे घडले तर मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, असं चव्हाण म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

