ससून रुग्णालयात तलवार-पिस्तुलाने रुग्णावर जीवघेणा हल्ला; फरार आरोपी अखेर 3 वर्षांनी अटकेत

पुणे:पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर हल्ला झाला होता. तलवार, कोयता आणि पिस्तुलाच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करून आरोपी फरार झाला होता. आतामागील तीन वर्षापासून पोलिसांना चकवा देऊन फरार असलेल्या आरोपीला अखेर बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे (वय २६, रा. वडारवाडी) याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला तुषार हनुमंत हंबीर याला चालता येत नसल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तरीही, रोहित धोत्रेसह एकूण पाच आरोपींनी रुग्णालयात घुसखोरी केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हंबीरवर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला.
या हल्ल्यात फिर्यादी हंबीरला वाचवण्यासाठी आलेले पोलीस गार्ड आणि हंबीरच्या मेहुण्याच्या हातावरही आरोपींनी वार करून त्यांना जखमी केलं. याचवेळी एका आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्नही केल्यानं रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एकूण १२ आरोपी निष्पन्न केले होते. त्यापैकी ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली.

. मात्र, गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपींपैकी एक असलेला रोहित ऊर्फ तम्मा धोत्रे हा पोलिसांना सापडत नव्हता.गोपनीय माहितीनुसार, अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांना धोत्रे हा केसनंद परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने तात्काळ सापळा रचून तीन वर्षांपासून फरार असलेल्या तम्मा धोत्रेला ताब्यात घेतले आहे. यामुळे या गंभीर गुन्ह्यातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

