माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना अश्रूपूर्वक निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे :माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं 12 डिसेंबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज,लिंगायत समाजाच्या प्रथेनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.शासकीय मान वंदना देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्ययात्रेला आज सकाळी देवघर येथील त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. वरवंटी गावच्या शिवारात असलेल्या त्यांच्या चाकूरकर फार्म हाऊसपर्यंत ही अंत्ययात्रा नेण्यात आली. अंत्ययात्रेच्या अग्रभागी त्यांचे चिरंजीव शैलेश पाटील चाकूरकर उपस्थित होते. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर रुद्रली पाटील चाकूरकर आणि ऋषिका पाटील चाकूरकर हे ही शैलेश पाटील चाकूरकर यांच्याबरोबर चालत होते. या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक अंतिम दर्शनासाठी आले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याला अश्रूंच्या साक्षीने निरोप दिला.
कोण आहेत शिवराज पाटील चाकूरकर?

भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म : १२ ऑक्टोबर १९३५) हे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मले. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली

शिवराज पाटील यांनी अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी ताकद लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसची शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून होती.
दरम्यान मागील काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर आज लिंगायत समाजाच्या प्रथेनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनसाठी हजारोंचा जनसागर आला होता. आज लातूर शहरात देखील बंद पाळण्यात आला होता.
