मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना चाप, ‘या’ बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी


पुणे:राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्र्यांना खासगी सचिवांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. त्यावरुन महायुतीमधील काही मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठी नवी सूचना जारी केली आहे. त्यानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या बैठकीत बोलवण्यासाठी मंत्र्यांना मुख्यमंत्री कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर आले असून राज्यातील प्रशासनिक शिस्त आणि समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासंदर्भात नवा आणि कडक नियम लागू केला आहे. यानुसार, यापुढे कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यालयाबाहेर बैठकीसाठी बोलवता येणार नाही. अशा बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासन आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यां सोबत बैठका घेण्यासाठी सोमवार आणि गुरुवार हे दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. याच दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनिक कामकाजात सातत्य राहील आणि अधिकारी अनावश्यक प्रवासामुळे मुख्यालयापासून दूर राहणार नाहीत, असा उद्देश या निर्णयामागे आहे.

या नव्या नियमांनुसार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व मंत्र्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकांना बोलवण्यासाठी यापुढे मुख्यमंत्री कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!