मध्यरात्री दिल्लीत खलबत, रविंद्र चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

दिल्ली: राज्यातील आगामी निवडणुकांची रणनीती, महायुतीचे गणित आणि मनपा सत्तेचे आकडे यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापू लागले आहेत. अशातच आता राजधानी दिल्लीत मध्यरात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रविंद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये भाजपा राज्यात स्वतंत्र लढली तर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात, महायुती झाली तर कोणत्या महापालिकांमध्ये सत्ता स्थिर राहू शकते, तसेच महायुती न झाल्यास कुठे धोका निर्माण होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा चव्हाण यांनी शहा यांच्यासमोर मांडला.
त्याचबरोबर, कोणत्या मनपांमध्ये भाजप थेट महापौर बसवू शकते आणि महायुती टिकली तर कुठल्या मनपांमध्ये महायुतीचा महापौर संभवतो, याबाबतही सविस्तर आकडेवारी चर्चेत ठेवण्यात आली.आगामी मनपा निवडणुकीतील धोरणे, संभाव्य महायुती, उमेदवारी, तसेच स्वतंत्र लढण्याच्या पर्यायांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.या चर्चेचा सारांश चव्हाण यांनी थेट अमित शहा यांच्याकडे सोपवला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान भाजपच्या अंतर्गत बैठका, रणनीती आणि दिल्लीतील अचानक झालेल्या या रात्रीच्या हालचालीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

