पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

पुणे:पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या विक्रीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्या अमेडिया कंपनीचा भागिदार दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घोटाळ्या प्रकरणी दाखल पोलीस तक्रारीत पार्थ पवारांचे नाव का नाही? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. तसेच तहसीलदार सूर्यकांत येवले आणि निबंधक रविंद्र तारू हा देखील अटकेत आहे. मात्र घोटाळ्याप्रकरणी दाखल पोलीस तक्रारीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे नाव का नाही? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. त्यावर अद्याप चौकशी सुरू आहे, असे थातुरमातूर उत्तर देऊन पोलिसांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिने बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनवाणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांच्याबद्दल विचारणा केली. उच्च न्यायालयाने अचानक पार्थ पवार यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केल्याने पोलीसही गडबडले. याप्रकरणी आमचा तपास सुरू असल्याचे सांगून पोलिसांनी वेळ मारून नेली. त्यामुळे पार्थ पवारांवर सरकार मेहरबान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

