डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पुणे: सामाजिक आणि कामगार चळवळीतील झुंजार नेते आणि समाजवादी विचारवंत डॉ.बाबा आढाव यांचे काल 8 डिसेंबर रोजी रात्री निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, मजूर चळवळ आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी निस्वार्थी कार्य केले. त्यांच्या स्मृतीस शासकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतल्याने अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया प्रशासकीय देखरेखीखाली सुसूत्र पद्धतीने पार पाडली जाणार आहे.
आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई, मलुं असीम, अंबर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. सामाजिक कार्य, कामगार चळवळ, साहित्य या क्षेत्रात त्यांनी अमीट छाप सोडली आहे. प्रामुख्याने असंघटित कामगारांसाठी केलेल्या कार्यामुळे ते राज्यातच नाही तर देशात ओळखले जातात.वयाच्या 95 व्या वर्षी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

