पुण्यातील बेपत्ता निखिल रणदिवे प्रकरण; पुणे पोलीस अधीक्षकांना दलित संघटनेचा दोन दिवसाचा अल्टिमेटम, प्रकरण भोवणार?

पुणे : पुणे पोलीस दलातील अंतर्गत वादातूनच एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल रणदिवे हे 5 डिसेंबरपासून बेपत्ता झाले आहेत. पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता पुणे पोलीस अधीक्षकांना रिपब्लिकन पक्षासह सर्व दलित संघटनेने दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या दोन दिवसात निखिल रणदिवे यांचा शोध लावावा, दोन दिवसाच्या आज शोध लागला नाही आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दडस आणि पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले नाही तर यवत पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षासह सर्व दलित संघटनेने दिला आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते पंकज धिवार यांनी सांगितले आहे.
निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, नारायण देशमुख हे निखिल रणदिवे यांना कार्यमुक्त करण्यास नकार दिला. तसेच मुलीच्या आजारपणात आणि तिच्या पहिल्या वाढदिवसाला सुट्टी मागितली असता, ती नाकारण्यात आल्याने रणदिवे प्रचंड मानसिक तणावात होते.

मानसिक छळ आणि गेल्या वर्षभरापासून हुकूमशाही पद्धतीने वागणूक मिळत असून, सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. निखिल रणदिवे यांच्या पोस्टमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हेदेखील नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
