लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह-इन मधील तरुणीशी शारीरिक संबंध; नंतर लग्नास नकार देऊन मारहाण, लोणीकंद पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..

लोणी काळभोर : लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देत मारहाण करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर, पुणे.) याला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकार २२ एप्रिल २०२४ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला आहे.

दोघांचे कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर दोघांनी चंदननगर परिसरात लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या काळात श्रीकांत याने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले आणि या विश्वासावरून दोघांनी लोणीकंदमधील लॉजमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.

तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तरुणीने आपणास मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे. फिर्याद दाखल होताच लोणीकंद पोलिसांनी श्रीकांत शिंदे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
