पुण्यात ‘एसीबी’ची मोठी कारवाई ; तब्बल 8 कोटीच्या लाचप्रकरणी सोसायटी लिक्किडेटर आणि ऑडिटर जाळ्यात

पुणे : पुण्यामध्ये लासलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात मोठी कारवाई केली असून तब्बल आठ कोटीची लाच मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. भास्कर पोळ आणि विनोद देशमुख अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. धनकवडी मधील एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेत हा प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?

सन 2005 मध्ये 61 वर्षीय तक्रारदारासह 33 जणांनी जुन्या सभासदांकडून शेअर्स खरेदी करून या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. 2020 मध्ये सभासदत्वावरून वाद निर्माण झाल्याने सहकार विभागाने सोसायटीवर प्रशासक नेमला. नंतर 2024 मध्ये सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली आणि विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती झाली. तक्रारदार व इतर 32 सभासदांनी 2023 मध्ये तत्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. पोळ यांनी इतर 32 जणांचे अर्ज निकाली काढले, मात्र तक्रारदार सुनावणीस हजर नसल्याने त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला.सप्टेंबर 2025 मध्ये तक्रारदार पोळ यांच्याकडे चौकशीस गेले असता पोळ यांनी स्वतःसाठी व सध्याचे लिक्विडेटर देशमुख यांच्यासाठी 3 कोटी, तर भावी लिलावात तक्रारदार सांगतील त्या व्यक्तीला मालमत्ता देण्यासाठी 5 कोटी अशी एकूण 8 कोटी रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने प्रथम लाचेची पडताळणी केली व त्यात 8 कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 30 लाख रुपये अॅडव्हान्स ठरले. एसीबीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या ऑफिससमोर देशमुख स्वतः पैसे घेण्यासाठी हजर झाले. त्यांनी पंचांसमोर 30 लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.

या प्रकरणी प्रशासक भास्कर पोळ याच्यासह सोसायटीचा अवसायक विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. धायरी फाटा) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत. आतापर्यंतची सर्वात मोठी करावी असल्याचं म्हटले जात आहे.
