शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!आता १०० वर्षांपूर्वीचे सातबारे काढता येणार,पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे निर्देश

पुणे : नुकताच तलाठ्यांच्या खाबुगिरीला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. यापुढे ऑनलाईन काढण्यात येणाऱ्या सातबाऱ्यावर तलाठ्यांच्या सहीची गरज नसेल, फक्त पंधरा रुपयांमध्ये सातबारा डाऊनलोड करता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाने या संदर्भातील शासन परिपत्रक जारी देखील करण्यात आले. त्यानंतर आता शंभर वर्षांपूर्वीचा सातबारा काढता येणार आहे.अवघ्या काही मिनिटात शेतकरी डिजिटल सातबारा काढू शकतात. पुणे जिल्ह्यातील सातबारा उतारा, जन्म मृत्यूंच्या दाखल्यांसह सात कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम ६० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे महिन्याभरात तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिले आहे.

कागदपत्र स्कॅनिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खूप जुने उतारेदेखील एका क्लिकवर मिळणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुण्यातील जुने उतारे स्कॅन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. पणे जिल्ह्यात एकूण १३ तहसील कार्यालये, ११ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, ३ नगरभूमापन कार्यालय आहे. या एकूण २७ कार्यालयांमधील तीन कोटी २१ लाख कागदपत्रे स्कॅन करण्यात येणार आहे. यासाठी ६० लाख कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पुण्यातील विविध तालुक्यांमधील १०० वर्षांपूर्वीचे सातबारे, १९३० पासूनचे जन्म मृत्यूचे दाखले, फेरफार, आठ अ, कडई पत्र, इनाम पत्र ही सात कागदपत्रे स्कॅन केली जात आहे. यामध्ये ३ कोटी ३१ लाख ४७३ कागदपत्रांचे स्कॅनिंग करायचे आहे. त्यातील दोन कोटी ३८ लाख ६२२ कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातील १ कोटी ५७ लाख कागदपत्रे स्कॅन झाले आहेत. ८० लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग बाकी आहे.

या कागदपत्रांचे स्कॅन झाल्यानंतर या प्रती वाचता येतात का हे चेक केले जाईल. यानंतर मेटा डेटा एन्ट्री केली जाईल. याची पत्र जमावबंदी आयुक्तालयाकडे पाठवली जाईल. त्यांच्याकडून तालुकानिहाय पडताळणी केली जाईल. यानंतर सातबारा डिजिटल उपलब्ध होणार आहे
