‘कोकण हापूस’ आंब्यावर गुजरातची नजर ; वलसाड हापूस नावाने GI टॅगसाठी अर्ज, वाद पेटणार?

मुंबई : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप होत असताना आता त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. पण यावेळी प्रकल्प नव्हे तर कोकणच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची जोरदार चर्चा आहे.गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी जगभरात ओळख असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनाच्या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यातील हापूस आंब्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या मानांकनाला गुजरातकडून थेट आव्हान दिले गेले आहे. गुजरात सरकारच्या पाठबळावर ‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.

‘कोकण हापूस’ हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा आहे, ज्याला स्वतंत्र भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. 2018 साली मिळालेल्या या GI टॅगमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि परिसरातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख, चांगला दर आणि संरक्षण मिळाले. या मानांकनामुळे कोकण हापूसची निर्यात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये वाढली आहे. GI टॅगमुळे बनावट किंवा इतर राज्यातील आंब्यांची ‘कोकण हापूस’ म्हणून विक्री रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.गुजरातमधील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाची प्राथमिक सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी पार पडली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. गुजरातच्या या दाव्यामुळे आंबा उत्पादकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कोकणचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कुणीही दावा करू शकतो, त्यात काहीच अडचण नाही मात्र आमच्या कोकणातील हापूस आंब्याचा हक्कासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. केंद्रात राणे साहेब,सुनील तटकरे साहेब यासारखे नेते आहेत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक जुटीने आंब्याच्या बाजूने उभे राहू आणि त्याचे संरक्षण करू अशी पहिली प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

