भारतातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार, जाणून घ्या महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर…

नवी दिल्ली : भारतात पगाराचा आकडा सातत्याने बदलत आहे. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर सर्वात कमी वेतन कोणत्या राज्यात मिळते याविषयीची चर्चा आता समाज माध्यमावर रंगली आहे. RPG समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर वाद पेटला आहे.

प्रत्येक राज्यातील सरासरी मासिक वेतनाचे आकडे त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये राज्यनिहाय सरासरी मासिक वेतनाचा तपशील देण्यात आला आहे. या आकडेवारीत दिल्ली ते बिहारपर्यंत पगारातील मोठी दरी स्पष्ट दिसून येते.

हर्ष गोयंका यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत खऱ्या अर्थाने सशक्त आणि समृद्ध तेव्हाच होईल, जेव्हा सर्वसामान्य व तळागाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल. मग असा प्रश्न निर्माण होतो की देशातील सर्वाधिक पगार कुठे मिळतो? आणि त्यात महाराष्ट्राचा क्रमांक नक्की कोणता? ते आपण जाणून घेऊयात..

फोर्ब्स ॲडव्हायझर इंडियाच्या नव्या आकडेवारीनुसार, 2025 पर्यंत भारतातील सरासरी मासिक वेतन 28,000 रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. मात्र काही राज्यांत हा आकडा सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. राजधानी दिल्लीने यामध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असून येथे सरासरी मासिक वेतन 35,000 रुपये इतके आहे.
दिल्लीचा हा आकडा नोकऱ्यांची उपलब्धता, सेवा क्षेत्राचा विस्तार, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील उच्च वेतनमान यामुळे सतत वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत असल्याने कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर असून येथे सरासरी वेतन 33,000 रुपये आहे.
महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक, आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि पुणे हे उभरते IT हब यामुळे राज्यात उच्च वेतनाची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळेच महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा ठरतो.
राज्यातील सरासरी मासिक वेतन 32,000 रुपये इतके आहे. मुंबईतील बँकिंग-फायनान्स, फिल्म इंडस्ट्रीपासून ते पुण्यातील IT-Pune Cluster पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. या आकडेवारीवरून महाराष्ट्र देशातील टॉप 3 उच्च वेतन देणाऱ्या राज्यांमध्ये आपले स्थान कायम ठेवतो.
महाराष्ट्रानंतर तेलंगणा चौथ्या क्रमांकावर असून येथे सरासरी वेतन 31,000 रुपये आहे. हैदराबादमधील IT उद्योगाचा जलद विस्तार, स्टार्टअप कल्चर आणि वाढती गुंतवणूक हा या वाढीचा मुख्य आधार आहे.
दरम्यान, या आकडेवारीत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बिहारमध्ये देशातील सर्वात कमी पगार मिळतो. बिहारचे सरासरी मासिक वेतन फक्त 13,500 रुपये आहे. मर्यादित औद्योगिकीकरण, रोजगाराच्या अल्प संधी आणि गुंतवणूक कमी असल्याने या राज्यात पगाराची पातळी देखील स्थिर किंवा कमी राहते.
