नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून रान पेटलं! सत्ताधारी अजित पवारांपाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकला

नाशिक : नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.या प्रकरणावर सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. आता यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या विषयावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनात उतरणार आहे.

नाशिकमध्ये साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाने संतापाची लाट उसळली असून या वृक्ष तोडी विरोधात आज शिंदेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षांसह आता सत्ताधारी पक्ष देखील तपोवनातील वृक्षतोड रोखण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोड विषयावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.

नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पासाठी सुरू असलेल्या 1800 झाडांच्या तोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचा आवाज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मनसेच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करणार आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
