पुण्याच्या तरुणाला विवाह जुळवणीत लाखोंना फसवलं, लग्न करून परत येताच नवरी पळाली…

पुणे : पालम शहरात लग्न जमवण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे येथील एका कुटुंबाला बनावट नवरी दाखवून लाखोंची रक्कम उकळण्यात आली आणि लग्नानंतर ती महागड्या दागिन्यांसह कारमधून पळून गेली.

तसेच या घटनेने मोरे कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.विवाह-जुळवणीचे आमिष दाखवणाऱ्या टोळीने पूर्ण नियोजन करून हा प्रकार रचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. किरण रोहिदास मोरे हे नातेवाईकांसह पालम येथे मुलगी पाहण्यासाठी आले होते.

त्यांचा संपर्क काही एजंटांशी झाला, ज्यात महिला एजंटांचाही समावेश होता. या एजंटांनी आधीच सरला कोलते या नावाने धनगर टाकळी येथील पत्त्यावर एक बनावट नवरी तयार ठेवली होती. तिच्यासाठी खोटे आधार कार्ड बनवण्यात आले होते, ज्यामुळे ती खरी असल्याचा भास निर्माण झाला.

मोरे कुटुंबाला ती मुलगी दाखवण्यात आली आणि पसंती मिळाल्यानंतर एजंटांनी विवाहाची तयारी सुरू असल्याचे सांगून मोठी रक्कम आणि दागिने घेतले. त्यांनी २ लाख ९० हजार रुपये रोख तसेच ३५ हजारांच्या किमतीचे मंगळसूत्र आणि इतर जोडवे दागिने ताब्यात घेतले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरात लग्न लावून देण्यात आले. सर्व प्रक्रिया व्यवस्थित झाल्यासारखी भासवून टोळीने मोरे कुटुंबाचा विश्वास जिंकला.
दरम्यान, लग्नानंतर नवरा-नवरीला कारमधून पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र त्यांच्या मागे एक संशयास्पद वाहन येत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंब सावध झाले. अंबाजोगाई येथे चहासाठी कार थांबवल्यानंतरच खरा प्रकार उघड झाला. बनावट नवरी क्षणात कारमधून उतरून दागिन्यांसह फरार झाली.
या प्रकरणानंतर मोरे कुटुंबाने पालम पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन महिला एजंटांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून या गुन्ह्यात एकूण ११ आरोपी सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सर्वांची तपासणी सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे विवाह-जुळवणीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेटचे गंभीर स्वरूप पुन्हा समोर आले आहे.
