ब्रेकिंग! नगरपरिषद, नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर…


मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्यामुळे आता निकालही लांबणीवर पडला असून याबाबतचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवला आहे. नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात २ डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आणि २० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल एकत्रित २१ डिसेंबरला देण्याचा निर्णय दिला होता. २ डिसेंबर रोजी झालेल्या मत मोजणीनंतर थेट २१ डिसेंबर रोजीच निकाल लागणार असल्याने अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मतमोजणी तातडीने घ्याव्यात अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, नागपूर खंडपीठाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच घेणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल कायम ठेवला. त्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणीदेखील सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत केली.

       

सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!