अंधारात मोबाईलवर बोलणे आले अंगलट, बिबट्याचा तरुणावर हल्ला, कुठे घडली घटना?

पुणे : पुण्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत बिबट्याने अंधारात बोलणाऱ्या तरुणावर हल्ला केल्याचा थरार समोर आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून हा तरूण बचावला आहे.

नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ हा थरार घडला. १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा तरुण अंधारात बोलत होता. त्यावेळी रात्रीचे सव्वा आठ वाजले होते. हा तरुण फोनवर बोलण्यात गुंग असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

बिबट्याचे नखे त्याच्या पोटरीवर आले. नखांचे मोठे ओरखडे झाले. तो जखमी झाला. नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे. तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत सध्या स्थिर आहे.

या घटनेनंतर वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल या परिसरात बिबट्यांनी चार पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता.
वनविभागाने या परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची वारंवारता वाढली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती आहे. पूर्वीच्या ओतूर, शेटेवाडी व शिवनेरीसारख्या घटनांमुळे वन्यजीव-मानव संघर्ष तीव्र झाला. रात्री मुक्त संचार टाळा व वनविभागाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात येत आहे.
