पुण्यासह राज्यातील 80 हजार शाळा आज बंद ; शिक्षकांचं मोठं आंदोलन, काय आहेत मागण्या?

पुणे: राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आज (५ डिसेंबर) रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यातील 80 हजार शाळा आज बंद राहणार आहेत.

पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ आयोजित केला आहे. आंबेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सुमारे २८२ शाळांमधील ११५० शिक्षक आज सामूहिक रजा घेऊन या आंदोलनात सहभागी होत आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील शाळांचे कामकाज ठप्प होणार आहे.

शिक्षकांच्या आंदोलनाची काय आहेत कारणे?

1. शिक्षक कपात (पदे कमी करणे): सरकारने नवीन नियमांनुसार केलेली ‘संचमान्यता’ यामुळे राज्यभरातील २० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत, ज्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये नोकरी जाण्याची भीती आहे.
2.टीईटीची सक्ती: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, शिक्षकांना दोन वर्षांत टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले जाऊ शकते.
3.ऑनलाइन कामांचा ताण: शिक्षकांना अध्यापनाशिवाय अनेक ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांचा मोठा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
दरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आता वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे आणि संच मान्यता प्रक्रियेवर तात्पुरती स्थगितीही दिली आहे. या विषयावर शिक्षकांकडून विधायक सूचना आल्यास शासन निश्चितपणे त्यावर विचार करेल,असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
