पवार कुटुंबातून मोठी बातमी! अजितदादांच्या लेकाच्या लग्नाला कुटुंबियांची दांडी, नेमकं कारण काय?


बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाहसोहळा बहरीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. येत्या ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी बहरीनमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.

मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. जय पवार यांच्या विवाहसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब अनुपस्थित राहणार असल्याचे बोललं जात आहे. जय पवार यांच्या लग्नाला अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

त्यासोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील लग्नाला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ असलेले श्रीनिवास पवार हे जय पवार यांच्या विवाहसोहळ्यासाठी बहरीनला जाणार नाहीत. श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बंगळुरु येथील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे ते बहरीन येथील कार्यक्रमात गैरहजर राहतील.

       

त्यांच्यासोबतच शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित नसणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे कौटुंबिक मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. श्रीनिवास पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोललं जात आहे.

जय पवार यांच्या लग्नासाठी ४०० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या लग्नसोहळ्याला पवार कुटुंबातून शरद पवार गटाचे युवा नेते आणि श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे त्यांची नवविवाहित पत्नी तनिष्का कुलकर्णी यांच्यासह उपस्थित राहणार आहे.

युगेंद्र आणि तनिष्का जय पवार यांच्या लग्नासाठी बहरीनला जाणार आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे ही देखील जय पवारच्या लग्नासाठी उपस्थित राहणार आहे. यामुळे एका बाजूला काका श्रीनिवास पवार गैरहजर राहणार असले तरी चुलत भाऊ युगेंद्र पवार आणि बहीण रेवती लग्नाला उपस्थिती दर्शवणार आहेत.

नुकताच युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा ३० नोव्हेंबरला मुबईतील बीकेसी येथे पार पडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने युगेंद्र पवारांच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. युगेंद्र यांच्या विवाहसोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार अशा संपूर्ण पवार कुटुंबाने हजेरी लावली होती.

दरम्यान जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा परदेशात बहरीन या ठिकाणी होत आहे. हा विवाहसोहळा ४ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून ४ डिसेंबरला मेहंदी, ५ डिसेंबरला हळदी, वरात आणि लग्नसोहळा पार पडेल. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी बीच ऑलिम्पिक्स आयोजित करण्यात येणार असून ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!