टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना…!


 

पुणे : भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून करण्यात आलेल्या मारहाणीत तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमितकुमार विश्वकर्मा (वय २१, रा. लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शंतनू शिवराज चाटे (वय – १९, रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दिलीप बाबुराव हांगे (रा. साई पार्क सोसायटी, आळंदी) पसार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावमधील सार्वजनिक रस्त्यावरून अमितकुमार चालला असताना वडगांव-शिंदे रस्त्यावर चार-पाच जण भांडण करीत होते. अमितकुमार घाबरून पळून जात असताना शंतनू आणि इतरांना त्याने भांडण सोडविल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे टोळक्याने पाठलाग करून अमितकुमारवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, तरुणावर वार करणारे लोहगाव परिसरात थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार स्वप्नील कांबळे आणि विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमितकुमारने गाडी आडवी केल्याने त्याच्यावर वार केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!