पुण्यातील हिजवडी अपघातातील मृतांची संख्या वाढली ; एकाच कुटुंबातील तीन जण ठार

पुणे : पुण्यातील आयटी हब या ठिकाणी असलेल्या हिंजवडी परिसरात काल सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी भरधाव बस थेट पदपथावर चढली.या बसने दोन शाळकरी सख्या बहिण भावांनां चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणखी दोघजण गंभीर जखमी आहेत.या अपघातात एकाच कुटुंबातील ३ लहान मुलांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भर रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेमुळे हिंजवडीमधील वाहतुकीची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा गंभीर ऐरणीवर आली आहे.

नेमकं काय घडलं?
पुण्यातील हिंजवडी परिसरात काल संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान भीषण अपघात घडला. आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा चालक छत्रपती शिवाजी चौकाजवळ पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली ही बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर चढली. यावेळी फुटपाथवर चालणाऱ्या अनेक पादचारी जखमी झाले. तसेच या बसच्या चाकाखाली चिरडल्याने देवा प्रसाद कुटुंबातील ८ वर्षांची अर्चना आणि तिचा ६ वर्षांचा लहान भाऊ सुरज यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात त्यांची मोठी बहीण प्रिया देवा प्रसाद (१४) ही जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील तीन निरागस बालकांना जीव गमवावा लागल्याने त्यांच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान हिंजवडी पोलिसांनी केवळ चालकालाच नव्हे तर बस पुरवणारा मॅनेजर भाऊसाहेब घोलप यालाही अटक केली आहे. चालकाची योग्य तपासणी न करता त्याला कामावर ठेवल्याबद्दल आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांची अनियंत्रित वर्दळ, खराब रस्ते आणि चालकांचा बेदरकारपणा यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाला कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांचे हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात असे बळी जातच राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.