ब्रेकिंग! राज्य निवडणूक आयोग न्यायालयीन कचाट्यात, नागपूर खंडपीठात आज सुनावणी

पुणे : आज राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले असले तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात उमेदवारांनी आव्हान दिलं आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठात आज सकाळी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. या सुनावणीत काय होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आज या ठिकाणी मतदान होणार नाही.दरम्यान सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होईल. दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमावर काही उमेदवारांनी आक्षेप घेत याचिका दाखल केले आहेत.यासंदर्भात उमेदवारांचे जे आक्षेप आहे, त्यासाठी आवश्यक स्पष्टीकरणासह आयोगानं कोर्टात हजर राहण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे आता सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया होईल की नाही हे याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल. थोड्याच वेळात याविषयीचा निकाल समोर येणार आहे.
दरम्यान नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) खंडपीठ आणि मुंबईतही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांनी या सुधारीत निवडणूक कार्यक्रमाला आव्हान दिले आहे. त्यामुळे या सुनावणीत आता काय निकाल लागतो हे चित्र स्पष्ट होणार आहे.

