महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी! सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या..

पुणे : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला होता. टीईटी सक्ती, शिक्षक समायोजन प्रक्रिया आणि अनेक शाळा बंद पडण्याच्या भीतीमुळे शिक्षक संघटना एकजूट होऊन राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करत होत्या.
तसेच अगदी ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची घोषणा देखील करण्यात आली होती. या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य शासनाने शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षक समायोजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे हजारो शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात शाळांमधील शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे ६०० हून अधिक मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आणि विद्यार्थी शाळाबाह्य राहण्याची शक्यता वर्तवली जात होती.

या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निरीक्षणानंतर शासनाला प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश देण्यात आले.

अखेर आज शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, पुढील कोणतीही समायोजन प्रक्रिया २०२५-२६ च्या संचमान्यता प्रसिद्ध झाल्यानंतरच राबवली जाईल, म्हणजेच डिसेंबरमध्ये होणारी समायोजन प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवला आहे.
दरम्यान, २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार समायोजन केले असते तर काही महिन्यांनंतर २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार पुन्हा एकदा समायोजन करावे लागले असते. प्रशासनाच्या मते, ही दुबार प्रक्रिया गैरसोयीची आणि वेळखाऊ ठरली असती. त्यामुळे फक्त २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसारच एकदाच समायोजन करण्याचा निर्णय अधिक योग्य असल्याचे सरकारला वाटले.
मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आधीच्या संचमान्यतेनुसार समायोजन केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान अपरिहार्य होते आणि अनेक शाळा बंद पडण्याचा धोका होता.
