अजित पवारांनी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावं ; ठाकरेंच्या ‘या’ नेत्यानं डिवंचल

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. या पार्श्वभूमीवर
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा आहे. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना टोला लगावला आहे. महापालिकेची निवडणूक एकत्र लढवायची असेल तर आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडा, मग सोबत येऊन निवडणूक लढवू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
याबाबत पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊन निवडणूक लढवायची असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडा. मग सोबत येऊन निवडणूक लढवू,. त्यांनी उगीच ताकाला जाऊन भांड लपवू नये. सत्तेची फळं देखील तुम्ही चाखायची आणि विरोधात देखील तुम्हीच येऊन बसायचं, असं कसं चालेल? म्हणजे तुमची पाचही बोट तुपात, असं चालणार नाही. तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहायचं असेल तर तुम्ही विरोधी बाकावर बसायला हवं”, असं ते म्हणाले.
दरम्यान अजित पवार यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं आणि मग सोबत यावं, असं झालं तर बरं होईल. तसं जर झालं तर मग तुम्ही नक्की जात्यात आहात की सुपात आहात हे आम्हाला देखील कळेल. एक तरी तिकडे राहा किंवा इकडे या नाहीतर स्वतंत्र लढा. असं झालं तर काही होऊ शकत नाही. तर तुम्ही म्हणाल पालकमंत्री देखील आमचा असेल, आम्ही सत्तेत देखील बसू, आमचे मंत्रिमंडळात देखील सदस्य असतील आणि विरोधी पक्षात सुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू असं कसं चालेल?”, असं म्हणत वसंत मोरे यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. यावर आता अजित पवार काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान नुकतेच दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडीसाठी तयार नाहीत. दोन राष्ट्रवादींची युती झाल्यास आपण तात्पुरता राजकीय सन्यास घेऊ, असं जगताप यांनी जाहीरच करून टाकलं आहे. त्यामुळे त्यांना समजावण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावर आपली भूमिका मांडली आहे.

