दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर स्लिपर बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ८ जण जखमी

दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर पहाटे स्लिपर बसचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. पोलिस तपास सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील कैथुन पोलीस स्टेशन परिसरातील अरनखेडा गावाजवळील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. पहाटे ४:३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. ४२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या खासगी बसच्या भीषण अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.अपघात इतका भीषण होता कि बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान या अपघातात बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. मृतांमध्ये मंदाना येथील रहिवासी गिरिराज रेबारी आणि बोरखेडा येथील रहिवासी श्यामसुंदर सेन यांचा समावेश आहे. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बस क्रेनच्या सहाय्याने काढून बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे

