नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय ; ‘या’ रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद

पुणे : पुण्यातील नवले पूल परिसरात कंटेनर आणि इतर वाहनांच्या अपघातात आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहतूक विभागाने सुरक्षिततेला प्राधान्य देत या पुलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नऱ्हे गावातील मानाजीनगर व जांभूळवाडी परिसरातील काही प्रवेश मार्ग कायमस्वरूपी बंद केले आहेत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी हा प्रवेश मार्ग कायमस्वरूपी सिमेंट काँक्रेटचे दुभाजक लावून बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नऱ्हे गावातील मानाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना आता थेट मुंबई बंगळूरू महामार्गावर प्रवेश करता येणार नाही. या मार्गावरून सर्रास वाहनांची घुसखोरी होत असल्यानं वारंवार अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या कारणामुळे हा प्रवेश मार्ग सिमेंट काँक्रीटच्या दुभाजकाद्वारे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.आता या बाजूने येणाऱ्या वाहनांना केवळ सर्व्हिस रोडचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, अपघाताचा धोका टाळण्यासाठी जांभूळवाडी परिसरातील दोन रस्ते कायमस्वरूपी बंद होणार आहे.
दरम्यान नवले पुलाकडून साताऱ्याच्या दिशेनं जाताना, जांभूळवाडी तलावाजवळील हॉटेल आणि लॉज परिसरातील दोन रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची उलट दिशेने धाव घेत असल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. यावर कठोर कारवाई करत वाहतूक विभागाने हे दोन्ही रस्ते लोखंडी दुभाजकाद्वारे कायमस्वरूपी बंद केले आहेत.

