शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळांना ‘या’ दिवशी राहणार सुट्टी, नेमकं कारण काय?


पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक दिवस अचानक सुट्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर उपाय न झाल्याने शिक्षक संघटना आक्रमक भूमिका घेत असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.

या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

मुख्याध्यापक संघाची पुण्यात एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने अद्याप आवश्यक तो निर्णय न घेतल्यामुळे ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाने घेतला आहे.

       

दरम्यान, या दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला शाळा चालवणे अवघड होईल आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांना एक अचानक सुट्टी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. ५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याची तयारीही सुरू आहे.

शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघाकडून अनेक मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्वपूर्ण मागणी म्हणजे २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये. शासनाच्या नव्या नियमानुसार टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळू शकते, जे शिक्षकांसाठी अन्यायकारक असल्याचे मानले जात आहे.

दुसरी महत्वाची मागणी म्हणजे मार्च २०२४ मध्ये जारी करण्यात आलेला संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. या निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतील, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी शिक्षकांची आग्रही मागणी आहे.

तसेच, शिक्षण सेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी मिळावी, अशी मागणीही जोरदार पद्धतीने पुढे मांडण्यात आली आहे. शिक्षण सेवक म्हणून दीर्घकाळ काम करत असूनही नियमित वेतन आणि सुविधा न मिळाल्याने शिक्षक नाराज आहेत.

दरम्यान, राज्यातील शैक्षणिक यंत्रणेत मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर ५ डिसेंबरचा संप टळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे या दिवशी राज्यातील जवळपास सर्वच शाळा बंद राहण्याची परिस्थिती निर्माण होणार असून विद्यार्थ्यांना एक दिवसाची अनपेक्षित सुट्टी मिळू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!