मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! निवडणुकीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार…


नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली अशा नगरपरिषद, नगरपंचायतींबद्दल काय निकाल दिला जातो, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल शुक्रवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते

अशातच आता निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, असे कोर्टाने सांगितले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या ४० नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींचा अशा एकूण ५७ संस्था अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल, अशी माहिती कोर्टाने दिली आहे.

न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याचाच अर्थ कोणत्याही निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया सुरू राहील. मात्र ज्या ४० नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक ओलांडली गेली आहे, त्यांचा अंतिम निकाल या प्रकरणाच्या निकालावर अवलंबून असेल. याचाच अर्थ या ५७ संस्थांमध्ये निवडून आलेले उमेदवार तेव्हाच पद ग्रहण करू शकतील, जेव्हा सर्वोच्च न्यायालय आरक्षण वैध ठरवेल, असेही माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली.

       

उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत, राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. मात्र उर्वरित संस्थांच्या निवडणुका घेताना कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक नसावी. ही अट देखील या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणीची तारीख २१ जानेवारी रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर त्या निकालांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!