नवले पुलाच्या अपघातानंतर खासदार मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडवर; अवजड गाड्यांबाबत घेतला मोठा निर्णय

पुणे : पुण्याच्या नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. या अघघातात एका ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. अपघातानंतर लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आता केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी तातडीची बैठक बोलावली. या तिने अवजड वाहनाबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय हवाई उड्डाण वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही नवले पुलाजवळील वाढत्या अपघातांचा आज आढावा घेतला आहे. यावेळी कात्रजचा नवा बोगदा (जांभूळवाडी) ते नवले उड्डाणपूल या दरम्यानचे अपघात कमी करण्यासाठी तातडीच्या, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील वेगमर्यादा ६० वरुन ३० किमी प्रतितास करणार, अशी घोषणा खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली. तर आरटीओच्या माध्यमातून लोड चेकिंगही केले जाणार आहे. अवजड माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं, तर त्यांना तात्काळ दंड ठोठावण्याची व्यवस्था करण्याचा मोठा निर्णयही मोहोळांनी जाहीर केला आहे.
दरम्यान खेड शिवापूर टोलनाक्यावर अवजड वाहनांचा लोड चेक केला जाईल. तो जास्त असेल तर दंडही आकारला जाईल आणि जागेवरच लोड कमी करण्याची व्यवस्था केली जाईल. सहा स्पीडगन लावल्या जातील. अवजड माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी वेगमर्यादेचं उल्लंघन केलं, तर घरी चालान पाठवलं जाईलच, मात्र पुढच्या टोलनाक्यावर तातडीने अडवून दंड केला जाईल, अशी व्यवस्था करावी लागेल, असेही मोहोळ यांनी म्हटल आहे.
