उद्या १४ नोव्हेंबरला शाळा, कॉलेज, ऑफिसला सुट्टी राहणार, नेमकं कारण काय?

पुणे : बालदिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यंदा काही भागांमध्ये शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच १४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणून बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलं अतिशय प्रिय होती, म्हणून हा दिवस मुलांना समर्पित आहे.

सामान्यतः बालदिनाला देशभरातील शाळांमध्ये मुलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन केलं जातं, मात्र नियमित शाळा सुरूच राहतात. पण यंदा भारतातील काही भागांमध्ये विशेष कारणामुळे शाळा, कॉलेज आणि ऑफिसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तेलंगणामधील हैदराबादच्या ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकारी हरिचंदन दसारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ज्या शाळा आणि संस्थांमध्ये मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, त्यांना पगारी सुट्टी दिली जाणार आहे.
या सुट्टीचा उद्देश मतमोजणी प्रक्रियेला कोणताही अडथळा न येता ती सुरळीत पार पाडणे आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक, कर्मचारी वर्गाला वेळ देणे हा आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, अनेक शिक्षक आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतलेले असल्याने शाळा बंद ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व सरकारी कार्यालयांना रजा देण्यात आली आहे, कारण अनेक कर्मचारी मतदार आहेत.
