पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, देशमुख कुटुंबियासाह हजारो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत

पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुण्यात ताकद असणारे देशमुख कुटुंब आणि हजारो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.गुरूवारी चाकणमध्ये होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

निवडणुकीच्या तोंडावरच उत्तर पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठं खिंडार पडले आहेत. अतुल देशमुखांसह नगरसेवक आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हाती होणार आहे. अतुल देशमुख यांची उत्तर पुण्यात मोठी ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यासह राज्यभरात कार्यकर्ते, पदाधिकारी दिग्गज नेते साथ सोडून जात असल्याने निवडणुकीआधीच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी होत आहे. उत्तर पुण्यातील पवारांचे शिलेदार अतुल देशमुख शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार आहेत. चाकणमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थित गुरूवार देशमुख यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिंदे यांची ताकद वाढणार आहे.
