वनाज- रामवाडी मेट्रो मार्ग आता ‘या’ गावापर्यंत विस्तारला जाणार, पुणेकरांसाठी महत्वाचा असलेला हा मार्ग कसा असेल? जाणून घ्या…

पुणे : पुण्यातील मेट्रो मार्गांचा जलद गतीने विस्तार केला जात असून यामुळे नजीकच्या भविष्यात पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

अशातच आता येत्या काळात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा सुद्धा विस्तार करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग थेट वाघोली पर्यंत आणि पुढे विठ्ठल वाडी पर्यंत विस्तारित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे या 11.63 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी महा मेट्रो कडून लवकरच निविदा निघणार आहेत. या प्रस्तावित मार्गावर एकूण 11 स्टेशन विकसित होणार आहेत.

तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्ग प्रकल्प अंतर्गत रामवाडी ते वाघोली ते विठ्ठलवाडी असा डबल-डेकर फ्लायओव्हर उभारला जाणार आहे. हा फ्लायओव्हर पुणे-शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे.
म्हणूनच राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि महा मेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून डबल डेकर फ्लायओव्हरचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे वनाज ते रामवाडी या मार्गाचा वनाज ते चांदणी चौक असा पण विस्तार होणार आहे.
या मेट्रो मार्गाची तर निविदा सुद्धा निघाली आहे. आता रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी या दोन्ही विस्तारांचं काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान या दोन्ही विस्तारांचे काम पूर्ण झाले की हा पूर्ण मेट्रोमार्ग 28.45 किलोमीटर लांबीचा होणार आहे आणि यावर एकूण 29 स्टेशन असतील.
दरम्यान, यामुळे पुण्यातील बहुतांशी भाग मेट्रो ने थेट कनेक्ट होईल आणि पुणेकरांचा प्रवास या निमित्ताने वेगवान होईल अशी आशा आहे. रामवाडी ते वाघोली आणि पुढे विठ्ठलवाडी पर्यंत होणारा विस्तार पुण्याच्या पूर्वेकडील भागातील वाहतूक कोंडीला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवेल असेही बोलले जात आहे.
