कॉल फॉरवर्डिंगमुळे मोठा स्कॅम, ‘असा’ होतो तुमचा डेटा डायव्हर्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. सध्या ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’ नावाचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे तुमची महत्त्वाची माहिती आणि पैसे धोक्यात येऊ शकतात. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकारच्या फसवणुकीत, सायबर गुन्हेगार तुम्हाला अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल करतात किंवा मेसेज पाठवतात. ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये विशिष्ट कोड (*#२१# किंवा *#४०१# सारखे USSD कोड) डायल करायला सांगतात. आकर्षक ऑफर्सचे किंवा तांत्रिक मदतीचे आमिष दाखवून तुम्हाला हे कोड डायल करण्यास प्रवृत्त केले जाते.

तसेच तुम्ही हा कोड डायल करताच, तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व कॉल्स, ज्यात बँकेकडून येणारे OTP, बँक व्यवहारांची माहिती देणारे कॉल्स किंवा UPI संबंधित कॉल्स समाविष्ट असतात, ते आपोआप सायबर गुन्हेगाराच्या नंबरवर फॉरवर्ड (वळवले) होतात. यामुळे नकळतपणे तुमच्या कॉल सर्व्हिसचे नियंत्रण त्यांच्या हातात जाते आणि ते तुमच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करू शकतात.

दरम्यान, या कॉल फॉरवर्डिंग स्कॅममुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. फॉरवर्ड झालेल्या कॉल्समधून गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातून आलेले OTP मिळवतात, ज्यामुळे ते तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात किंवा ऑनलाइन व्यवहार करू शकतात.
याशिवाय, ते तुमच्या वैयक्तिक माहितीचा (उदा. नाव, पत्ता, बँक तपशील) गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल किंवा त्रास देऊ शकतात. फसव्या योजनांमध्ये तुम्हाला अडकवले जाऊ शकते.
यापासून वाचण्यासाठी अनोळखी व्यक्तीने सांगितलेले कोणतेही कोड तुमच्या मोबाईलमध्ये डायल करू नका. तुमच्या फोनमधील सर्व प्रकारचे कॉल फॉरवर्डिंग बंद करण्यासाठी ##००२# हा कोड डायल करा.
जर तुम्हाला तुमच्या फोनवर कॉल फॉरवर्डिंग सक्रिय झाल्याचा संशय आल्यास, तात्काळ तुमच्या मोबाईल ऑपरेटरच्या कस्टमर केअरशी किंवा बँकेशी संपर्क साधा. सायबर गुन्हेगारीबाबत कोणतीही तक्रार असल्यास www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहन पुणे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
